आश्वी | वार्ताहर
समाज प्रबोधनकार निवृती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या निवासस्थानी शनिवारी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी अचानक भेट देवून त्यांच्या कुटुंबियांसमवेत संवाद साधला. दरम्यान यावेळी इंदोरीकर महाराजानी खासदार विखे यांना फेटा बाधंला तर खा. विखेनी महाराजाना जय श्रीराम नावे असलेली शाल भेट दिल्यामुळे पुन्हा एकदा ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
सम विषम तारखेच्या वक्तव्यानंतर निवृती महाराज देशमुख यांच्या विरोधात सुरू झालेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर निवृती महाराज देशमुख यांच्या निवासस्थानी मनसे, भाजपसह अनेक राजकीय नेत्यांनी भेटी देवून त्यांना पाठबळ दिले. काही दिवसापूर्वी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही इंदोरीकर महाराजाच्या निवासस्थानी भेट देवून त्यांच्याशी बंद खोलीत चर्चा करुन इंदोरीकर महाराजाबाबत राज्य सरकारने सहानुभूती दाखवायला हवी होती असे सांगत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली होती.
खा. सुजय विखे पाटील यांनी शनिवारी सायंकाळी अचानक इंदोरीकर महाराज यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीची कोणालाही माहीती नव्हती. खा. डॉ. विखे यांनी इंदोरीकर महाराजासह त्यांच्या कुटुंबीयाशी संवाद साधत सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. दरम्यान यावेळी खा. डॉ. सुजय विखे यांचा निवृती महाराजांनी फेटा बांधून संत्कार केला. तर खा. डॉ. विखेंनी मात्र 'जय श्रीराम' ची शाल देवून महाराजांचा केलेला संत्कार सर्वासाठी लक्षवेधी ठरला आहे.
विशेष म्हणजे या भेटीची कोणालाही कल्पना नव्हती. यापूर्वी आ. विखे पाटील यांनी भेट घेतल्यानंतर पुन्हा खा. डॉ. विखे यांनी महाराजांची घेतलेली भेट महत्वाची मानली जात असून या भेटीबाबत अधिक माहिती घेतली असता ही फक्त सदीच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले आहे.
खा.डॉ.सुजय विखे यांनी घेतली इंदोरीकर महाराजांची भेट