नगर – पेमराज सारडा महाविद्यालयात स्व.दिनुभाऊ कुलकणी यांनी क्रीडा चे बीजे रोवली. आता महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक, प्राचार्य हे क्रीडा विभागाला वेग देत आहेत. क्रीडा शिक्षक खेळाडूंना हिऱ्यांप्रमाणे पैलू पडून घडवत आहेत. त्यामुळेच महाविद्यालयाचा क्रीडा विभाग आज राज्यात व अॅकॅडमी मध्ये अव्वल झाला आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी यश मिळवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योग्य नेतृत्वामुळे ऑलंपिक मध्ये भारताने मोठे यश मिळवले आहे. खेलरत्न पुरस्कार ध्यानचंद यांच्या नावाने सुरु केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाला सारडा यांनी केले.मराज सारडा महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध खेळांच्या स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचा खास ब्लेझर देवून सन्मान करण्यात आला. हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी विद्यार्थी व राष्ट्रीय खेळाडू सुहास विश्वासराव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अजित बोरा, जेष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, प्रा.मकरंद खेर, डॉ.पारस कोठारी, रणजीत श्रीगोड, प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.संजय धोपावकर, क्रीडा शिक्षक प्रा.संजय साठे आदींसह प्राध्यापक व खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा.शिरीष मोडक म्हणाले, सारडा महाविद्यालयातील खेळाडूंनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे नाव देशपातळीवर उंचावले आहे. खेळात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक गुणांमध्येही वाढ होत असल्याने विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाकडे वळावे, असे आवाहन केले.
संजय जोशी यांनी सारडा महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना सर्व भौतिक सुविधा देण्याबरोबरच क्रीडा साठी सर्व प्रकारचे सहकार्य संस्था करत आहे, असे सांगितले. अजित बोरा यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. क्रीडा विभाग प्रमुख प्रा.संजय धोपावकर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. प्रा.संजय साठे यांनी आभार मानले, प्रा.अरविंद झरेकर यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी उपप्राचार्या डॉ.मंगला भोसले, डॉ.मिलिंद देशपांडे, प्रबंधक अशोक असेरी, बी.यु.कुलकर्णी आदी उपस्थित होते. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रणिती सोमण (सायकलिंग), सुयोग वाघ (चेस), संकल्प थोरात (सायकलिंग), मंगेश ताकमोगे (सायकलिंग), भारती आचार्य (रायफल शुटींग), तेजस्वीनी कदम (रायफल शुटींग), अदिती भेसे (रायफल शुटींग), चतुर देवेश (रायफल शुटींग), राजश्री फटांगडे (रायफल शुटींग), सिद्धांत पीडीयार (सायकलिंग), पारस नाथू (सायकलिंग), सर्वे वरद (सायकलिंग), केदार साठे (सायकलिंग) राष्ट्रीय खेळाडूंना ब्लेझर देण्यात आले.